पांडवगड किल्ला - Heritage my India

Latest

Wednesday, May 9, 2018

पांडवगड किल्ला

पांडवगड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
वाई गावाला खेटूनच उभा असलेला पांडवगड त्याच्या विशिष्ट अशा रचनेमुळे नेहमी लक्ष वेधून घेतो. माथ्यावर कातळ भिंतिचा मुकुट परिधान केलेला हा किल्ला वाईहून सहज पायी जाता येण्यासारखा आहे. वाई मांढरदेव मार्गावर हा गड आहे.
इतिहास : चालुक्यांच्या राज्यांनतर शिलाहारांनी पन्हाळा -कोल्हापूर दख्खन या भागावर राजय चालविले. १९९१-९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला से पुरावे आढळतात. हा किल्ला प्रथम आदीलशाहीत होता. ७ ऑक्टोंबर १६७३ मध्ये मराठ्यांनी तो जिंकला. पुढे १७०१ औरंगजेबाने हा किल्ला घेतला. त्यानंतर शाहू महाराजांनी किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी पांडवगड आपल्या ताब्यात आणला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकणे : मेणवली गावातून आपण पहिल्या माचिवर गेलो असता तेथून जवळच भैरोबाचे मंदिर लागते. त्याच्याबाहेरच काही प्राचीन मूर्तीचे अवशेष आहेत. तेथे कातळात कोरलेल्या काही पायऱ्या आहेत. येथून साधारण १५ ते २० मिनिटांवर गडाचे प्रवेशद्वार लागते. कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या साह्याने थोडे वर गेल्यावर आपण माची सारख्या भागात प्रवेश करतो. गडाच्या उत्तरबाजुला काही टाकी आढळतात समोरच पारश्याचा एक बंगला आहे. बंगल्या समोरच कुंपण घातलेले एक टाके आहे. येथून आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यावर वाटेत काही अवशेष दिसतात. तर एका ठिकाणी सलग सहा पाण्याची टाकी आढळतात. त्यापैकी एक पाण्याचं टाकं मोठे असून त्याच्या आतील बाजूस खांब देखील आहेत. गावऱ्यांच्या मते टाक्यातील पाण्याचा रंग वेगवेगळा होता. येथूनच एक पायवाट बालेकिल्ल्याकडे जाते. बालेकिल्ल्याला काहीश्या पायऱ्या व तटबंदी शिल्लक आहे. डावीकडे गेल्यावर एका उघड्या मंदिरात दगडात कोरलेला मारुतीची मूर्ती दिसते. पुढे काही अंतरावर पांडजाइ देवीचे मोडकळीस आलेले मंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर एक तळे आहे. आता मात्र सुकलेल्या अवस्थेत आहे. बालेकिल्ल्याच्या दक्षिणेस इमारतीचे काही अवशेष दिसतात. या इमारतीचा पाया ३० फुट रुंद असा आहे. तसे पाहिले तर बालेकिल्ला फारच छोटा आहे. गडाच्या उत्तरेकडे थोडेसे पठार आहे. लोहगडाच्या विंचुकाठ्या सारखा थोडा भाग पुढे आला आहे. गडाच्या पूर्वेकडे एक वाटा धावडी गावात उतरते. याच गावात जवळ पांडवलेणी आहेत. आपण जेव्हा मेणवली गावाकडून गडावर येतो. तेव्हा जे पहिले प्रवेशद्वार आहे तेथून गडाचा संपूर्ण घेरा ही खाजगी मालमत्ता आहे. या मागची घटना अशी की पांडवगड कोण्या एका सरदारची मालमत्ता होती यानंतर मॅपको कंपनीने तो विकत घेतला. सध्या श्री. सर्वोदय वाडीया नावाचे गृहस्थाने गडावर एक फलक देखील लावला आहे. त्याद्वारे गडावर मद्यप्राशन, धुम्रपान मादक पदार्थ सेवनास बंदी घातली आहे. सर्व गड फिरण्यास दोन तास पुरतात.
गडावर जाण्याच्या वाटा :
१. वाई ते मेणवली सतत गाड्यांची ये जा चालू असते. मेणवली गावा जवळून धोम धरणाचा जो कालवा गेला आहे तो पार केल्यावर समोरच पांडवगड दिसू लागतो. समोर असणाऱ्या पठारावर गेल्यावर दोन वाटा फुटतात. येथपर्यंत येण्यासाठी गावातून अर्धातास पुरतो. दोन वाटांपैकी एक वाट लांबची आणि वळसा घालून जाणारी आहे. पहिल्या वाटेन पायथ्यावरून गडावर जाण्यास १ तास पुरतो. या पठारावर कोळी लोकांची वस्ती आहे.
२. दुसरी वाट गुंडेवाडी गावातून वर जाते. वाई धावडी मार्गे गुंडेवाडी गावातून वर पोहचावे. गुंडेवाडी गावातून चांगली मळलेली आणि काही ठिकाणी अलिकडेच बांधलेल्या पायऱ्यांची सोपी वाट आहे. या वाटेने गडमाथा गाठण्यास २ तास पुरतात.
श्री सर्वादय वाडीया यांच्या घराबाहेरील शेड मध्ये १० जणांना राहता येते. व पांडजाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांना राहता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी मेणवली मार्गे १ तास, धावडी मार्गे २ तास लागतात.

No comments:

Post a Comment

Thank you for comment