घनगड किल्ला – ३००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
रायगड जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठीण समजला जातो.
मुळशीच्या पश्चिमेला एक मावळ भाग आहे यालाच ‘कोरसबारस’ मावळ म्हणतात. याच मावळात येणारा हा घनगड. आड बाजूला असलेला हा किल्ला मात्र आपल्यासारखा ट्रेकर्सला नेहमीच खुणावत राहतो. येथील जनजीवन शहरी सुखसोयीपासून दुरावलेले.
इतिहास : किल्ल्याच्या बद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. मात्र किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि नंतर मराठ्यांकडे आला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :किल्ल्यावर प्रवेश केल्यावर डाव्या हाताला असणारी टेकडीवर जाणारी वाट पकडावी. या वाटेने वर जातांना एका पडक्या दरवाजातून आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो. गडावर पडक्या घरांचे अवशेष आहेत. पाण्याची एक ते दोन टाकी आहेत. आजमितिस मात्र ती फुटलेली आहेत. बाकी किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत. किल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैला ची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट, भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुद्धा दिसतात.
गडावर जाण्याच्या वाटा : कठिण प्रस्तरारोहण आवश्यक.
ऐकोलेमार्गेकिल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे आणि ती ऐकोले गावातूनच वर जाते. मुंबईकरानी आणि पुणेकरांनी लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भाबुर्डेकडे जाणारी एस.टी. पकडावी. लोणावळा ते भांबुर्डे हे अंतर ४० कि.मी चे आहे. भांबुर्डेगावातून थेट ऐकोले गावात यावे. भांबुर्डे ते ऐकोले हे साधारणतः अंतर २० मिनिटाचे आहे. ऐकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. गावातून बाहेर पडल्यावर डावीकडची वाट पकडावी. ही वाट थेट किल्ल्यावर जाते. यावाटेने पुढे जातांना गारजाई देवीचे मंदिर लागते. या मंदिरात “श्री गारआई महाराजाची व किले घनगडाची” असा शिलालेख कोरलेला आहे. मंदिराच्या समोरच एक तोफगोळा पडलेला आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूनेच किल्ल्यावर जाणारी वाट आहे.
येथून थोड्याच वेळात आपण एका कातळकड्यापाशी येऊन पोहचतो. गडावर जाणारी वाट इंग्रजांनी सुरुंग लावून चिणून काढली आहे. १५ फुटाच्या ह्या कड्यावर थोडे प्रस्तरारोहण करून चढून जावे लागते. आवश्यक असल्यास १५ फुटाचा दोर लावावा. हा कडा पार केला की आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो.
राहण्याची सोय : वर राहण्याची सोय नाही मात्र गारजाई च्या मंदिरात २० लोकांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ : ऐकोले गावातून अर्धातास.
No comments:
Post a Comment
Thank you for comment